आपला जिल्हा
निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने पोलिस पाटलांचे सेलू उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

परभणी : ( प्रतिनिधी ) परभणी लोकसभा निवडणुकीवेळी मतदान केंद्रावर पोलिस पाटलांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. दहा दिवस उलटले तरीही निवडणूक भत्ता मिळाला नसल्याने पोलिस पाटलांनी सेलू उपविभागीय अधिकारी यांच्याकडे साकडे घालून भत्ता देण्याची मागणी 8 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली. निवेदनात म्हटले की, जिंतूर सेलू विधानसभा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या विविध गावातील मतदान केंद्रावर सह-निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये मतदान केंद्रावर हजर राहून कर्तव्य बजावले. मतदान केंद्रावरील पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत, अधिकारी, कर्मचारी यांच्या भोजनाची व्यवस्था, मतदानाच्या दिवशी आवश्यक सहकार्य पोलिस पाटलांनी केले. त्यासाठी २५ आणि २६ एप्रिलला निवडणूक मतदानाच्या दिवशी कर्तव्य पार पाडले. निवडणूक संपल्यानंतरच निवडणूक भत्ता देणे अपेक्षित असतानाही पोलिस पाटलांना भत्ता देण्यात आला नसल्याने पोलिस पाटलांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.




