आपला जिल्हा
उद्या सेलूत स्वामी गोविंददेवगिरिजी महाराजांच्या वाणीतून कथा प्रारंभ ; भव्य शोभायात्रा
⬛ सेलू येथे आयोजित राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या श्रीराम कथेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे.

सेलू ( प्रतिनिधी ) ता.14 अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत परमपूज्यस्वामी गोविंददेवगिरिजी महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सेलू येथील नूतन विद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘हनुमानगढ’ परिसरात मंगळवारपासून (१५ ऑक्टोबर) श्रीराम कथेला प्रारंभ होत आहे. कथेच्या निमित्ताने शहरात जागोजागी कथेच्या बॅनर, होर्डींंगने सर्वांचे लक्ष वेधले घेतले असून कथेसाठी सेलू शहर सज्ज झाले आहे.

बुधवार, २३ ऑक्टोबरपर्यंत दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत श्रीराम कथा (मराठीतून) होईल. यानिमित्ताने मंगळवारी सकाळी ८ वाजता श्रीकेशवराज बाबासाहेब मंदीर ते श्रीबालाजी मंदीरपर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. क्रांतीचौक, धनलक्ष्मी मंगल कार्यालय, सारंगीगल्ली हनुमान मंदिर, गंगाधर स्वामी मठ, मारवाडी गल्ली चौक मार्गाने श्री बालाजी मंदिरमध्ये शोभायात्रेची सांगता होणार आहे.
शोभायात्रेत श्रीरामायणासह विविध ग्रंथ दिंडी, बँड पथक, धर्म ध्वज, अश्व, मारोती, ध्वजधारी युवक, लेझीम पथक मुले-मुली, श्रीराम उत्सव मूर्ती, कलशधारी, तुळसधारी माता भगिनी, महिला भजनी व वारकरी भजनी मंडळ, वेद विद्यालयाचे विद्यार्थी, स्वामीजींचा रथ, माता-भगिनी, बंधू सहभागी होणार आहेत. तसेच विविध संत महात्मे, श्रीराम जन्म, गुरुकुल, केवटद्वारा श्रीराम चरण पूजा, प्रभू राम हनुमंत भेट, रामराज्यभिषेक, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य शपथ, भारतमाता व महापुरुषांचे सजीव देखावे विविध शाळांचे विद्यार्थी सादर करणार आहेत. शोभायात्रेत व कथा श्रवणासाठी सेलू शहर व परिसरातील महिला, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक जयप्रकाश बिहाणी, विजयकुमार बिहाणी आणि बिहाणी परिवारातर्फे करण्यात आले आहे.




