आपला जिल्हा

परभणीत रविवारी ‘शासन आपल्या दारी’;

• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

परभणी,दि.24 ( प्रतिनिधी ) : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करून त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार (दि. 27) रोजी सकाळी साडेअकरा वाजता ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापिठातील ग्रीष्म (दगडी) वसतिगृहासमोरील क्रीडा संकुलाच्या मैदानावर होणाऱ्या जिल्हास्तरीय विशेष कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत तसेच मंत्रिमंडळातील सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमातून जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेण्यात येत आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी आज (गुरुवार) कार्यक्रमस्थळाला भेट देवून पूर्वतयारीची पाहणी केली. तसेच या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सरपंचांना निमंत्रण देण्यात आले असून, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे सरपंच आणि लाभार्थ्यांशी यावेळी संवाद साधणार आहेत. तसेच कार्यक्रमस्थळी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार आहे. मुख्यमंत्री सहायता कक्षातर्फे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठीचे दालन ही असणार आहे. तसेच रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे.

परभणी जिल्ह्यातील प्राचीन ऐतिहासिक वारसा स्थापत्यांची माहिती देणारे प्रदर्शन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी आणि उपचारांची देखील सुविधा या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘शासन आपल्या दारी’ योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!