आपला जिल्हा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यात सुरु करण्यात येणाऱ्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा दूरदृष्यप्रणालीव्दारे शुभारंभ

परभणी, दि. 20 ( प्रतिनिधी ) : बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करुन देणे, स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्थसहाय्य प्रदान करणे, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून उमेदवारांना रोजगारक्षम बनविणे यासाठी परभणी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये सुरु करण्यात येणाऱ्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा शुभारंभ आज दूरदृष्यप्रणालीव्दारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यातील परभणी, पालम, मानवत, जिंतूर, पूर्णा, गंगाखेड आणि सेलू तालुक्यातील महाविद्यालयांनी नोंदणी केलेल्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचा” यामध्ये समावेश आहे.

वर्धा येथे आज आयोजित कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सदर योजनेचा शुभारंभ केला. परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथील ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सींग येथे शुभारंभाच्या थेट प्रक्षेपनासाठी आयोजित कार्यक्रमास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, कौशल्य विकास रोजगार व उदद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे, संस्थेचे उपाध्यक्ष कपिल देशमुख, प्राचार्य डॉ. समिर शेख, दिनेश देशमुख, उमेद मिलके आदी उपस्थित होते.

आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राव्दारे 15 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना सदर महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा वापर करुन पदवीतील कोर्सशी निगडीत कौशल्य प्रशिक्षण प्रदान केले जाणार आहे. त्यांना त्याव्दारे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणे हा शासनाचा मानस आहे. यामध्ये रोजगार/स्वयंरोजगारक्षम आभ्यासक्रमाची निवड करता येणार आहे. उमेदवारांची आवड व नोकरीची उपलब्धता आणि स्थानिक उद्योगांची गरज याचा विचार करुन अभ्यासक्रमाची निवड करण्यात आलेली आहे. सदरचे अभ्यासक्रम हे साधारणतः तीन महिन्यांत पूर्ण होऊ शकणारे असून किमान 200 व कमाल 500 तास इतका कालावधीचा अभ्यासक्रम असणार आहे.

जिल्ह्यातील परभणी तालुक्यात – ज्ञानसाधना कॉलेज ऑफ फार्मसी, धर्मापुरी, ग्रामीण आयटीआय, धर्मापुरी, दुर्गामाता इन्सीट्युट ऑफ फार्मसी, धर्मापुरी, ब्लेसींग कॉलेज ऑफ नर्सीग, धर्मापुरी. पूर्णा तालुक्यात – स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविदयालय, पूर्णा, श्री सिध्देश्वर वरीष्ठ महाविद्यालय पूर्णा, कडूजी पाटील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, धनगर टाकळी. मानवत तालुक्यात – श्री गणेश रामचंद्र कत्रुवार महाविद्यालय, मानवत. पालम तालुक्यात-ग्रामीण आयटीआय, सर्फराजपुर, पालम. जिंतूर तालुक्यात-श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर बीसीए व बीसीएस महाविद्यालय, जिंतूर. गंगाखेड तालुक्यात – स्व. कल्पना चावला कला व विज्ञान महिला वरिष्ठ महाविद्यालय, गंगाखेड. सेलू तालुक्यात – कृषी महाविद्यालय, सेलू, गुरु गंगाभारती महाविद्यालय, सेलू, पाथरी तालुक्यात – स्व. नितीन महाविद्यालय, पाथरी या महाविद्यालयांत आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना सुरु करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!