आपला जिल्हा

470 कोटीच्या विकास कामांना मान्यता – पालकमंत्री संजय बनसोडे

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2023-24 रु. 120.42 कोटींच्या कामांना मान्यता

परभणी, दि. 25 (प्रतिनिधी ) : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षांत नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासह विविध योजनासांठी 470.35 कोटी रुपयांच्या विकास कामांस जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोर सिंह परदेशी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून उपस्थित होते. तर दूरदृष्यप्रणालीव्दारे खासदार संजय जाधव, सर्वश्री आमदार राजेश विटेकर, डॉ. राहूल पाटील, रत्नाकर गुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 अंतर्गत रु. 120.42 कोटींच्या विकास कामांना तसेच सन 2024-25 अंतर्गत रु. 470.35 कोटींच्या विकास कामांना यावेळी मान्यता प्रदान केली असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील मान्यता देण्यात आलेली कामे विहित कालमर्यादेत आणि दर्जेदार होतील, यावर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. बनसोडे यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्हा नियोजन समिती संदर्भातील माहिती सादर केली.

यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती सादर केली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य आणि जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!