आपला जिल्हा

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींना वंदन करण्याचा दिवस – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी, दि. 15 ( प्रतिनिधी ) : पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमीस स्वतंत्र होण्याच्या घटनेस आज 77 वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणास लावले. ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय, अत्याचार सहन केले. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले. त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात श्री. गावडे यांच्या हस्ते पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रविद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे श्री. गावडे म्हणाले की, हजारो वर्षाची वैभवशाली परंपरा असणाऱ्या आपल्या देशाने स्वातंत्र्योत्तर काळात नेत्रदिपक प्रगती साधली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. भारतातील लोकशाही मूल्यांचे जतन झाल्याने आपल्या देशाने जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था निर्माण करुन जगासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपल्या देशाने मिश्र पद्धतीची अर्थव्यवस्था स्वीकारल्याने विकास प्रक्रिया सर्वसामान्यांपर्यंत पोहचत असल्याचे आपण पाहत असल्याचे सांगितले.

आपल्या जिल्ह्यासमोर विविध समस्या आहेत, परंतू या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. याकरीता शासन आणि प्रशासनामार्फत देखील सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण सर्वांनी मिळून सांघिक भावनेने या समस्यांचे निराकरण करू, नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करु असे सांगत जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, आणि पत्रकार उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमानंतर श्री. गावडे यांनी उपस्थितांना अभिवादन करत स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच स्वातंत्र्य सैनिक, वीरपत्नी, वीरमाता यांचा सत्कार केला.

 

यावेळी जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षातील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांच्या हस्ते वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या चित्ररथाचे आणि सामाजिक न्याय विभाग आणि दिव्यांग संघटना द्वारा नशामुक्त भारत अभियानास हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!