कृषी व व्यापार

मुलांनो अमली पदार्थांपासून दूर राहा! – पोलीस निरीक्षक दीपक बोरसे

सेलू (प्रतिनिधी):आज – काल गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुण-तरुणी मध्ये नशा घेणे ट्रेंड बनत चालला आहे. आपण जगापेक्षा काहीतरी वेगळे आहोत; असे दाखविण्याच्या नादात, शालेय व महाविद्यालयीन तरुण – तरुणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचे सेवन करताना आढळत आहेत. कोणत्याही व्यसनाचे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. दारू, सिगारेट, तंबाखू आदी सेवनामुळे जीव-घेणे आजार होतात, तसेच अमली पदार्थामुळे आरोग्यास हानी पोहोचते. सर्व खबरदारी घेवून मुलांनी अमली पदार्थापासून दूर राहावे असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी केले.

जागतिक अमली पदार्थ विरोधी जाणीव जागृती पंधरवडा निमित्ताने जनजागृती करण्यासाठी पोलीस स्टेशन सेलूच्या वतीने आज गुरुवार दिनांक २७ जून रोजी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशन निरीक्षक दीपक बोरसे यांनी नूतन विद्यालय येथे मार्गदर्शन केले. या प्रसंगी नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, उपमुख्याध्यापक के. के. देशपांडे, पर्यवेक्षक डी. डी. सोन्नेकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना पोलीस निरीक्षक दीपक बोरसे म्हणाले की, धकधकीच्या काळात तणावापासून आराम मिळण्यासाठी लोकांनी सिगरेट, दारू अन्य अमली पदार्थांचे सेवन करण्यास सुरुवात केली. यांच्या सेवनाने लोकांना आनंद मिळू लागल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे सेवन वाढले. तरुणाईही या पदार्थांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रणात सेवन करु लागली आहे. किशोरवयीन मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन वाढत आहे, तसेच या पदार्थांची अवैध तस्करीही सुरू आहे.

या कारणास्तव ७ सप्टेंबर १९८७ रोजी ‘संयुक्त राष्ट्र संघा’कडून समाजाला अमली पदार्थमुक्त करण्याचा अहवाल सादर केला गेला. २६ जून ला आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांविरुद्ध दिवस साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. जे सर्व देशांनकडून ते स्वीकारण्यात आले. तेव्हापासून ‘जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन’ दरवर्षी २६ जून रोजी साजरा केला जातो.

लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरुक करण्यासाठी तरुण मंडळी, किशोरवयीन मुलांमधील अमली पदार्थांचे व्यसन रोखणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तसेच ड्रग तस्करी रोखण्यासाठीही या मोहीमेला सुरुवात करण्यात आली. आज जगभरात अमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध जनजागृती होत आहे. त्यातून लोकांना होणाऱ्या हानींची जाणीव करून देण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. भारतातही ड्रग्जची अवैध तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.काशिनाथ पल्लेवाड तर आभार डॉ. एस. बी.मलसटवाड यांनी केले.

Back to top button
Don`t copy text!