आपला जिल्हा

कविता मिरगाच्या काव्य मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम

सेलू ( प्रतिनिधी ) : येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या ‘ कविता मिरगाच्या’ कवी संमेलनाला काव्य रसिकांनी अकराव्या वर्षीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘ मी लिहिलेल्या पुस्तकाला, एखादा नवा पुरस्कार मिळावा,

या पेक्षा वावरातल्या पिकाला, चांगला भाव मिळावा ‘ शेतकऱ्यांची आंतरिक भावना सांगणारी ही कविता नाशिक येथील कवी संदीप जगताप यांनी सादर केली. त्यांच्या या कवितेने रसिकांना अंतर्मुख केले. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात शुक्रवार ( दि. ०७ ) रोजी शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ कविता मिरगाच्या ‘ काव्य मैफिल संपन्न झाली. कवींनी सादर केलेल्या बहारदार कवितांनी सेलूकर काव्य रसिकांच्या काळजाचा ठाव घेतला. अंबाजोगाई येथील कवी मुकुंद राजपंखे यांच्या ‘ लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे ‘ या कवितेने रसिकांना भावनिक केले. परभणी येथील कवी कल्याण कदम यांच्या ‘ गेला तलाठी कोण्या गावा, संरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा ‘ या कवितेतील वास्तव चित्रण मन हेलावून गेले. छत्रपती संभाजी नगर येथील कवी भास्कर निर्मळ यांनी ‘ तो पोखरत नाही कुठलाही डोंगर , झाडांच्या मुळांना इजा होईल म्हणून ‘ या कवितेतून झाडांचे महत्त्व सांगितले. कवयित्री मधुरा उमरीकर यांची ‘ काळजाच्या आकांताची घालमेल, शब्दांशिवाय सांगत होत्या नदीच्या खळखळाटाला, काल चार कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला’ ही कविता मंत्रमुग्ध करून गेली. सेलू येथील कवी अशोक पाठक यांनी ‘ तुझ्या रुपाचं चांदणं, कसं पडलया गं दारी, माझ्या जीवाचिया झाली, तशी घालमेल पोरी’ या प्रेम कवितेतून हळव्या नात्याची उकल केली. कवी संमेलनाचे सुत्रसंचलन महेश अचिंतलवार यांनी केले. कवी संमेलनात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉ. सखाराम कदम, डॉ. शरद ठाकर यांचा तर पुस्तक प्रकाशित झाल्या बद्दल गंगाधर गायकवाड, प्रा. हनुमान व्हरगुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कवी डॉ. केशव खटींग, डॉ. गंगाधर गळगे, सुनील उबाळे, राजेश रेवले, प्रा. प्रविण पुरी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, रामराव गायकवाड, रामराव बोबडे यांची उपस्थिती होती. स्वागतपर मनोगत प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक डॉ. सतीश मगर यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुभाष मोहकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चंद्रशेखर मुळावेकर, सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, महादेव आगजाळ, पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके यांनी पुढाकार घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!