आपला जिल्हा
‘किस्ना ‘ शोषित समाजाचे प्रतिबिंब असणारा कथासंग्रह – अशोक उफाडे

सेलू ( प्रतिनिधी ) ‘ किस्ना ‘ शोषित समाजाचे प्रतिबिंब असणारा कथा संग्रह असून जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांचे चित्रण ‘ किस्ना ‘ त कथाकार भारत दाढेल यांनी रेखाटले आहे. ‘ किस्ना’ हा कथासंग्रह पिढ्यानपिढ्यांचे प्रतिनिधित्व करणारा आहे. असे प्रतिपादन कॉ. अशोक उफाडे यांनी केले. शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने ‘ एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमांतर्गत ‘ किस्ना’ या कथासंग्रहावर बुधवार ( दि. १५ ) रोजी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष एम. आर. पटेल हे होते. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक भुजंग थोरे, ‘ किस्ना’ कथासंग्रहाचे लेखक भारत दाढेल, बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यावाचस्पती पदवी मिळाल्याबद्दल डॉ. शरद ठाकर, मार्गदर्शक डॉ. अशोक पाठक, बी.बी.सी. चॅनलवर जिल्हा परिषद प्रशाला रायपूरचे प्रसारण झाल्या बद्दल माधव गव्हाणे आणि वाढदिवसानिमित्त डॉ. सुरेश उगले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना अशोक उफाडे म्हणाले की, ‘ ‘किस्ना’ कथासंग्रहात आठ कथा आहेत. संग्रहात माणसांचे दुःख, वेदना मांडल्या आहेत. या कथासंग्रहात गावगाड्या बाहेरील उपेक्षित , भुक आणि भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या, सोबतच नितीमत्ता जपणाऱ्या माणसांचे व्यक्ती चित्रण साकारले असून उद्याच्या सुंदर जीवनाचा आशावाद व्यक्त केला आहे. ‘
कथाकार भारत दाढेल यांनी ‘ किस्ना ‘ या कथासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया आपल्या मनोगतात व्यक्त केली. तर भुजंग थोरे यांनी आपल्या मनोगतात ‘ ‘किस्ना’ त शोषक आणि शोषित यांचे चित्रण समर्थणे लेखकाने साकारले आहे. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही आपली कथा वाटते. ‘ असे सांगितले.
प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचलन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रंथालयाचे सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. उपक्रम यशस्वीतेसाठी ग्रंथालयाचे महादेव आगजाळ, पंडित जगाडे, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास बाबासाहेब चारठाणकर, प्रा. ए. टी. देशमुख, दिलीप डासाळकर, राजेश उफाडे, मोहन बोराडे, विलास मोरे, डॉ. सतीश मगर, राजेंद्र पाटोळे, आबासाहेब लोंढे, प्रा. विजया दाढेल, किर्ती राऊत, सुरेखा आगळे , वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेलू : येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने आयोजित ‘ एक दिवस एक पुस्तक’ उपक्रमांत ‘ किस्ना ‘ कथासंग्रहावर बोलताना कॉ. अशोक उफाडे, मंचावर एम. आर पटेल, अशोक काकडे, भारत दाढेल, भुजंग थोरे, सुरेश हिवाळे.