परभणी ( प्रतिनिधी )पवित्र पोर्टलमध्ये कलाशिक्षक हे पद भरती करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा परभणी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
सध्याच्या शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलमध्ये कलाशिक्षक हे पद दिसुन येत नाही त्यामुळे कलाशिक्षकांची पद भरती बंद आहे. त्यामुळे शालेय कला शिक्षणापासुन विद्यार्थी वंचित रहात आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कला शिक्षण हे अत्यंत महत्वाचे आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास होऊन तो विद्यार्थी कलेमुळे जीवनात आनंदी व समाधानी होत असतो. समाजात आदर्श नागरिक घडुन येण्यासाठी कला हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा मानला जातो. कलेशिवाय जीवन निरर्थक ठरते हे इतिहासातील अनेक घटनांतून लक्षात येते.
आपल्या देशाला चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, नाट्यकला, गायनकला, वादनकलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. हे आपल्या देशातील विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळावरुन आणि विविध कला क्षेत्रातील दिग्गज कलावंताच्या सादरीकरणावरुन लक्षात येते. हा वारसा पिढ्यानपिढ्या चालत आला असून शालेय स्तरावरही अनेक वर्षापासुन कलाविषय कला शिक्षकांच्या मार्गदर्शनातून संपन्न झालेला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी विविध कला क्षेत्रात आपला नाव लौकिक मिळवत आहेत. कला विषयातही अनेक रोजगाराच्या व व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतांना शालेय पवित्र पोर्टल मध्ये गेले अनेक वर्षापासुन कला शिक्षक पद हे उडवले गेले आहे.
शाळेमध्ये कला शिक्षक असल्यास विविध चित्र, शिल्प, नृत्य, नाट्य, गायन, वादन, अशा विविध कला स्पर्धात विद्यार्थी मोठ्या उत्सहाने सहभागी होत असतो. त्याला शालेय शिक्षणाबरोबरच उतीर्ण झाल्यास त्याला दहावी बोर्ड परीक्षेत अधिक सवलतीचे गुण वाढले जातात.
तर दहावी उर्तीण झाल्यानंतर पुढील विविध शिक्षणात शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजीट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र प्रवेश पात्रतेसाठी गृहित धरले जाते. पुढे या विद्यार्थास विविध कलांची आवड निर्माण होऊन हा विद्यार्थी स्वतः स्वावलंबी बनुन देशाच्या विकासात मोठा हातभार लावु शकतो. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कला शिक्षणाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. कला शिक्षण म्हणजे विद्यार्थांच्या सर्वागिण विकासाच्या दृष्टीने महत्वपुर्ण असतांनाही शासन मात्र कला शिक्षणाकडे दुर्लक्ष करीत आहे. कलाशिक्षकांच्या अनेक जागा जवळपास सात वर्षापासुन रिक्त आहेत या रिक्त जागावर काही संस्थाचालक इतर शिक्षकांची भरती करतांना दिसत आहेत. त्यामुळे शिक्षण हे एकांगी व निरुत्साही होत आहे. त्यामुळे कला शिक्षक भरती करण्यात यावी असे महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे यांच्या वतीने कलाशिक्षक भरतीसाठी अनेक वेळा मागणी व निवेदने सादर करुन ही शासनाचे अद्याप पर्यंत लक्ष वेधले गेले नाही ही बाब शालेय विद्यार्थाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे असे लक्षात येते.
जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतः लक्ष घालुन शालेय विद्यार्थ्यांना कला शिक्षणापासुन वंचित राहू नये यासाठी कला शिक्षक हे पद शासनाच्या पवित्र पोर्टलमध्ये घेण्यासाठी शासनाकडे त्वरीत शिफारस करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिलाध्यक्ष केशव लगड जिल्हा सचिव अतुल सामाले माधव घयाळ विभागीय उपाध्यक्ष (छत्रपती संभाजी नगर विभाग), सोनकवडे ठी एच. शेखा जाहीद उमेर, चंद्रकोत गरूड,महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, पुणे जिल्हा शाखा परभणी आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.