सेलू ( प्रतिनिधी ) शालेय जीवनात कला शिक्षकांचे काम हे विद्यार्थ्यांच्या कलेतून दिसते कला शिक्षक विद्यार्थ्यांना घडवून आकार देतात आणि त्यांच्यामुळे मुले विविध कला क्षेत्रात आपलं नावलौकिक करतात असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक परभणी आर. बी. घोडके यांनी व्यक्त केले.
सेलू येथे सोमवार दि. 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळ पुणे सेलू शाखेच्या वतीने राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे यांचे विभागीय उपाध्यक्ष माधव घयाळ, परभणी जिल्हाध्यक्ष केशव लगड, जिल्हा सचिव अतुल सामाले, सेलू कलाध्यापक संघाचे अध्यक्ष किशोर कटारे, मोहन बोराडे यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ पुणे 42 वी कला शिक्षक व परिषद पालघर या ठिकाणी आदर्श कलाध्यापक पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळकृष्ण केदारी व गोविंद शिंदे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.
कलाध्यापक संघाचे विभागीय उपअध्यक्ष संभाजीनगर माधव घयाळ यांनी विविध प्रकारच्या कला आणि त्यातून मिळणारे कला शिक्षण यावर सविस्तरपणे मार्गदर्शन करून विद्यार्थी कलागुणांना कसा वाव मिळेल आणि यात कला शिक्षकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष केशव लगड यांनी कलाध्यापक पुरस्काराची निवड कशा प्रकारे होते आणि या दोन्ही शिक्षकांचे काम पाहून त्यांच्या कार्याचा गौरव होणे आपल्या परभणी जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून परभणी जिल्ह्यातील कला शिक्षकांनी अशाच प्रकारे आपले काम करून कला शिक्षणाचा प्रसार करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर कटारे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष ताल्डे यांनी केले तर स्वागत गीत सच्चिदानंद डाखोरे यांनी गायले आभार पांडुरंग पाटणकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षक रोहिदास चव्हाण, सुनील मोरे, फुलसिंग गावित, महादेव बोरकर,मुसळे आदींनी पुढाकार घेतला.