आपला जिल्हा

समाजकल्याण परभणी तर्फे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा

परभणी ( प्रतिनिधी ) भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्वावरील अनुच्छेद ३९ व ४१ मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतुद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या त- हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक /मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दिनांक ०९ जुलै २०१८ अन्वये निर्गमीत करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार ०१ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन (International Day of Older Person) म्हणुन साजरा करण्यात येतो.

त्यानुषंगाने परभणी जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण परभणी तर्फे स्नेह महिला निराधार गृह, असोला ता. जि. परभणी येथे ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला तसेच या दिनाचे औचित्य साधुन ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीमती गीता गुठ्ठे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण परभणी ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे श्री. मुकुंद नंद, श्री. डॉ. भारत नांदोरे, श्री. राजेश देशमुख, श्रीमती मंजुषा नरवाडकर, होमिओपॅथी वैद्यकीय अधिकारी, प्राथमीक आरोग्य केंद्र, असोला चे वैद्यकीय अधिकारी, श्रीमती मनिषा माने, डॉ. तृप्ती पोरवाल, अनिल अहिरे हे होते. तसेच स्नेह महिला निराधार गृह, असोला चे अध्यक्ष श्रीमती सुनिता अहिरे मॅडम, तेथील प्रवेशित ज्येष्ठ महिला मातोश्री वृध्दाश्रम येथील प्रवेशित वृध्द व इतर ज्येष्ठ नागरिक हे उपस्थित होते.

सर्व प्रथम महात्मा फुले, छत्रपती राजर्षि शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप प्रज्वलन करण्यात आले. तदनंतर स्नेह महिला निराधार गृहच्या अध्यक्षा श्रीमती सुनिता अहिरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती गीता गुठ्ठे मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच प्रमुख पाहुणे व इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यानंतर उपस्थित असलेले विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांची रॅली (फेरी) काढण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. अला रे आला आनंदाचा क्षण आला आजी-आजोबांना सांभाळा तीच आपली जीवनधारा, घरात आजी शिवाय संस्कार नाहीत आजोबा शिवाय संघर्ष नाही… आणि आजी आजोंबाशिवाय चार भिंतीची घर नाही, आजी आजोबांचा सन्मान करा त्यांचा सांभाळ करा तसेच भारत माता की जय व ज्येष्ठ नागरिक दिनांचा विजय असो अशा घोषणा दिल्याने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे मन भारावुन गेले.

प्रमुख पाहुणे श्री. मुकुंद नंद सर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आई वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ अधिनियम २०००७ तसेच २०१३ चे सर्वसमावेश ज्येष्ठ नागरिक धोरण यांची अंमलबजावणी बाबत मौल्यवान मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ नागरिकांनी सुसह्य व आनंदी जीवन जगाव या बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर मा. श्री. डॉ. भारत नांदोरे यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना झालेल्या गोष्टींचा पश्चाताप नकरता नेहमी आनंदी राहणे बाबत सल्ला दिला. त्यांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती गीता गुड्डे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, परभणी यांनी आई वडिल व ज्येष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ नियम २०१० या कायदयाबद्दल मार्गदर्शन केले तसेच याबाबतीत अर्जदारांच्या तक्रारी वाढत आहेत म्हणुन पाल्यांनी ज्येष्ठांना सन्मान देऊन त्यांची काळजी घेणे बाबत सल्ला दिला तसेच ज्येष्ठांनाही आपल्या तब्येतीची काळजी घेणे बाबत आवाहन केले. स्नेह महिला गृह येथील प्रवेशित श्रीमती गंगासागर बळीराम पांचाळ या महिलेने राहत असलेल्या वृध्दाश्रमावर एक सुंदर गीत गायन केले. तदनंतर आरोग्य तपासणी सुरु करण्यात आली सदर आरोग्य तपासणीत ९७ वृध्दांची तपासणी करण्यात आली व त्यानुसार औषधी व गोळया मोफत देण्यात आले. यानंतर उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना केळी व सफरचंद चे सर्व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचलन व आभार प्रदर्शन श्री. रेवण अप्पा साळेगांवकर यांनी करुन सदरील कार्यक्रम संपला असल्याचे जाहीर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!