सेलू ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान सेलू संचलित ज्ञानतीर्थ विद्यालयाचे शिक्षक नारायण बाबुराव चौरे यांच्या विज्ञान शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे . राज्य विज्ञान व गणित शिक्षक संस्था नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शन परभणी येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ येथे झाले.
५१ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनात जिल्ह्याभरातून प्राथमिक व माध्यमिक गटात एकूण अठरा शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य सादर केले. या शिक्षक साहित्य प्रदर्शनात ज्ञानतीर्थ विद्यालयाचे शिक्षक श्री नारायण चौरे यांनी तयार केलेल्या विज्ञान शैक्षणिक साहित्यास प्रथम क्रमांक मिळाला. तसेच या शैक्षणिक साहित्याची निवड ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, घटक संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.