आपला जिल्हा

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, वाहतुकीवर प्रतिबंध ठेवण्यासाठी चार पथके तैनात

परभणी, दि. 29 ( प्रतिनिधी ) : वर्षाच्या अखेरीस आणि नूतन वर्ष प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर अवैध पार्ट्या आयोजीत करण्याची शक्यता लक्षात घेता, अशा पार्ट्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यवाही करण्यासाठी चार पथक तैनात केली असल्याचे प्रसिद्धीपत्रकद्वारे कळविले आहे.

वर्षाखेरीस आणि नूतन वर्षारंभाच्या स्वागतासाठी अवैध पार्ट्या, बनावट मद्य वाहतूक, विक्री, बेकायदेशीर परराज्यातील मद्य आयात करणे, अवैध ढाबे, हॉटेल चालविण्यास आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून रात्री गस्त, नाकाबंदी तसेच तपासणी नाके उभारून कार्यवाही करण्यात येत आहे.

उत्पादन शुल्क विभागाची परवानगी न घेता अवैध पार्ट्या नियोजित करण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी उत्पादन शुल्काचा महसूल बुडवला जातो, तसेच या पार्ट्यात राज्यात विक्रीस बंदी असलेल्या बनावटीच्या मद्याबरोबरच कमी किंमतीत मिळणाऱ्या बनावट मद्याची विक्री केली जाण्याचीही शक्यता असते. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी संबंधित विभागाकडून कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

महारष्ट्र दारुबंदी अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे दाखल गुन्ह्याप्रकरणी आरोपींस तीन वर्ष ते पाच वर्ष तसेच 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत आर्थिक दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. न्यायालयाने अशा 20 प्रकरणात अवैध ढाबा चालक व मद्यपी यांना (एकूण 73 आरोपींना) एकूण पाच लाख रुपयांपर्यत दंड ठोठवला आहे.

तरी कोणीही अवैध मद्य खरेदी करु नये, तसेच जिल्ह्यात अवैद्य मद्य, बनावट व परराज्यातील विदेशी मद्य कोणी बाळगल्यास किंवा विक्री करीत असल्यास 9763973007 किंवा 18002339999 व व्हॉटस अप क्र. 8422001133 वर माहिती देण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!