आपला जिल्हा

मराठा सेवा संघाने समाजाला विधायक दिशा दिली – मधुकर महाराज बारुळकर

मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन सेलूमध्ये उत्साहात संपन्न

सेलू  ( प्रतिनिधी ) मराठा सेवा संघाने गत ३४ वर्षात विविध जाती,धर्मात जातीय-सामाजिक,धार्मिक सलोखा निर्माण केला. सर्व जाती-धर्माला एकत्रित बांधले. त्यांच्यात बंधुभाव निर्माण केला.सोबतच मराठा सेवा संघाने समाजाला विधायक दिशा दिली असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार तथा वक्ते मधुकर महाराज बारुळकर यांनी केले.ते मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त सेलू तालूका शाखेच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा,शिवकुटुंब मेळावा व समाज प्रबोधनात्मक व्याख्यान कार्यक्रमात शहरातील साई नाट्यगृहात शुक्रवार ( दि. ६ सप्टेंबर) रोजी बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजन व दीपप्रज्वलन करू जिजाऊ वंदनेने झाली. जिजाऊ वंदना डॉ.भास्कर शिंदे व सच्चिदानंद डाखोरे यांच्या संचाने सादर केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे हे होते. तर विचारमंचावर विभागीय अध्यक्ष बाळासाहेब यादव,जिल्हा उपाध्यक्ष सुनील जाधव,जिल्हा प्रवक्ता सुभाष ढगे,माजी तालुकाध्यक्ष शिवाजीराव जोगदंड, जनार्दन पाटील,तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मधुकर महाराज बारुळकर म्हणाले की, ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार जनमानसात रुजवून माणसाला माणूस जोडण्याचे मानवतावादी कार्य मराठा सेवा संघ करत आहे. ‘

काळानुसार व्यवसाय करावा
– विठ्ठल भुसारे

शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे म्हणाले की, ‘ समाजातील युवकांनी काळाची पावले ओळखून वाटचाल करावी.काळानुसार आपल्या व्यवसायात बदल करुन यशोशिखरे गाठावीत.उच्च शिक्षणातून स्वतः ची आणि समाजाची प्रगती साधावी.सध्याचा काळ हा ज्ञान,तंत्रज्ञान,स्पर्धेचा आहे. या काळात संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. आपली क्षमता,अंगभूत कौशल्य वाढवून आधुनिक युगातील संधीचे सोने करावे. ‘

 

मराठा सेवा संघाच्या उभारणीच्या कार्यात योगदान देणाऱ्या ३४ प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव गायकवाड यांनी केले. मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव बोबडे यांनी सेलूतील ३४ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. भूमिका तालुकाध्यक्ष मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी मांडली. सुत्रसंचलन डॉ.राजाराम झोडगे,माधव गव्हाणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.अनंत मोगल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शरद मगर,बाबासाहेब पावडे, प्रा.डॉ.रंजित गायके, प्रा.विलास खरात,दामोदर काकडे, राजेंद्र होलसुरे,अनिल पवार,नरेंद्र झाल्टे,अमोल मोगल, बाबासाहेब कास्टे, आत्माराम हरकळ, किरण जाधव,रामेश्वर मगर आदींनी पुढाकार घेतला.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!