सेलू ( प्रतिनिधी ) पालक आणि शिक्षकांनी अभ्यासासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. असे प्रतिपादन साहित्यिक तथा शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील सेवा निवृत्त अधिकारी नामदेव माळी ( सांगली ) यांनी मंगळवार ( दि. १७ ) रोजी वाचन प्रेरणा दिना निमित्त नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांशी प्रार्थनेच्या वेळी संवाद साधताना केले. व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण सोळंके, उपमुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक किरण देशपांडे, माजी विद्यार्थी कवी शरद ठाकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना नामदेव माळी म्हणाले की, ‘ आईवडील, शिक्षक आणि चांगली पुस्तके माणसांना घडवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप वाचन केले पाहिजे. चित्रकला, गायन, लेखन अशी कोणती तरी आवडती कला आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपला जीवन विकास केला पाहिजे. ‘ महाराष्ट्र राज्य गीताचे उत्तम सादरीकरण केल्या बद्दल नामदेव माळी यांनी संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे यांचा पुस्तक देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.