आपला जिल्हा

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र समिती आता गुरुवारी परभणी जिल्हा दौऱ्यावर

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून द्यावेत - जिल्हाधिकारी

परभणी,दि.13 (प्रतिनिधी ) : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य यांच्या परभणी जिल्हा दौऱ्यात बदल करण्यात आला असून, आता समिती अध्यक्ष व सदस्य हे गुरुवार (दि.19) रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या मराठा-कुणबी, कुणबी -मराठा जात प्रमाणपत्राशी संबंधित पुरावे असल्यास गुरुवारी समितीकडे देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत. समितीची बैठक गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, त्यानंतर नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे उपलब्ध करुन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समितीची बैठक यापूर्वी सोमवारी (दि.16) परभणी जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र आता समितीचे अध्यक्ष आणि सदस्य गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येणार आहेत. या दिवशी दुपारी 2 ते 4 या वेळेत नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार आहेत. पुरावा शक्यतो साक्षांकित असावा, असे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळविले आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!