सेलू ( प्रतिनिधी ) मोफत आणि सक्तीचे शैक्षणिक धोरण अवलंबिले तरच देश पुढे जात असतो. कंत्राटीकरण, खाजगीकरण हे सर्व सामान्य माणसाला मारक आहे.
त्यामुळेच शिक्षण व्यवस्था संपू पाहाणारे आदेश शासनाने तात्काळ रद्द केले पाहिजेत. असे प्रतिपादन संस्थाचालक महामंडळाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र लहाने यांनी केले. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ०२ ते ०७ ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्र शैक्षणिक संघर्ष सप्ताह निमित्त सोमवार ( दि.०२ ) ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ संलग्न परभणी जिल्हा शिक्षण संस्था महामंडळ व मुख्याध्यापक संघ, विविध शिक्षक संघटना, इतर सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कंत्राटी शिक्षक भरती, समुह शाळा, शाळा दत्तक योजनांचा आदेश शासनाने तात्काळ रद्द करावा या व इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलत होते. धरणे आंदोलनात नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, डि. व्ही. मुळे, चंद्रप्रकाश सांगतानी, अशोक काकडे, अॅड. महेश खारकर, मुंजाजी भिसे, साईराज बोराडे, कॉ. दत्तुसिंग ठाकूर, सुभाष शहाणे, चंद्रशेखर नावाडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना राजेंद्र लहाने म्हणाले की, ‘ सर्व सामान्यांच्या शिक्षण या मुलभूत अधिकारावर गदा येते आहे. म्हणूनच कंत्राटी शिक्षक भरती, समुह शाळा, शाळा दत्तक योजना या शासनाच्या आदेशा विरुद्ध आवाज उठविला पाहिजे. त्यासाठी एकजुट होऊन सर्वांना लढावे लागेल. ‘ या प्रसंगी माजी मुख्याध्यापक काशिनाथ वाघमारे, पी.जी. बोराडे, धनंजय भागवत, राम खराबे, रहिम खान पठाण, अॅड. विष्णू ढोले, कॉ.रामेश्वर पौळ यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांनी प्रास्ताविक केले. मराठवाडा शिक्षक संघाचे सदस्य सुरेश हिवाळे यांनी शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन केले. या प्रसंगी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सेलूचे नायब तहसीलदार अनिकेत पालेपवाड यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले. सुत्रसंचलन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले. धरणे आंदोलनात शहरातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, क्रीडा शिक्षक, विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.