आपला जिल्हा

पथकांनी उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवावा – अनुराग चंद्रा

परभणी, दि.29 (प्रतिनिधी ) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या कालावधीत पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहून, उमेदवरांच्या खर्चाचा अचूक हिशोब ठेवण्याचे निर्देश निवडणूक (खर्च) निरीक्षक अनुराग चंद्रा यांनी दिले. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. चंद्रा यांनी आज 95-जिंतूर विधानसभा मतदार संघाला प्रत्यक्ष भेट देवून निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेत संबंधीताना सूचना दिल्या.

यावेळी श्री. चंद्रा म्हणाले की, प्राप्तीकर विभाग, उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र वस्तू आणि सेवाकर विभागांनी निवडणुकीत मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे व दारूच्या वापरावर आळा घालण्यासाठी तसेच बेकायदा दारू आणि रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक व्हीएसटी, व्हीव्हीटी, आचारसंहिता पथक यांनी निवडणूक कालावधीत सतर्क राहावे. रोख रक्कमेची वाहतूक, पैशाचे हस्तातंरणावर लक्ष ठेवावे. उमेदवारांचा निवडणूक खर्च आणि बेकायदा पैशाचा होणार वापर याची काटेकोर तपासणी करण्याच्या सूचना देवून, राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्राप्तिकर विभाग तसेच एसएसटी विभागाने तयार केलेल्या चेकपोस्टबाबतचा आढावा देखील यावेळी श्री. चंद्रा यांनी घेतला.

तसेच सहाय्यक खर्च निरीक्षक यांनी खर्चाच्या बाबी कशा नोंदवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले . तसेच खर्च नोंदविण्यापूर्वी संबधित पथकांनी खर्च विषयक सर्व बाबी समाविष्ट होतील, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अनुराग चंद्रा यांनी निवडणुक कामासाठी तयार करण्यात आलेल्या विविध कक्षास भेट दिली.

यावेळी 95-जिंतूर विधानसभा मतदार संघातील सेलू तहसिलदार श्री. झांपले, निवडणुक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी सचिन कवटे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!