आपला जिल्हा
जिल्ह्यातील पुनर्रचित मतदान केंद्रांची प्रारुप यादी प्रसिद्ध
सात दिवसांच्या आत आक्षेप, हरकती स्विकारणार

परभणी, दि.२५ ( प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी मतदान केंद्राच्या यादीतील बदल प्रस्तावित केले असून, या प्रस्तावित यादीनुसार होणारे बदल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या शिफारशीसह मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या ३६ स्थानांमध्ये बदल करण्यात आले असून, तसेच १७ मतदान केंद्रांच्या नावातील बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. तसेच २७ नवीन प्रस्तावित मतदान केंद्र असून, १८ मतदान केंद्रांमध्ये बदल किंवा विलिनीकरण प्रस्तावित आहे. सध्या १ हजार ५५४ मतदान केंद्र अस्तित्वात असून, नव्याने १ हजार ५८१ मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत.
तत्पूर्वी या बदलासह अस्तित्वात असलेल्या मतदान केंद्राची प्रारूप यादी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारुप यादीवर कोणाला सूचना, आक्षेप किंवा हरकती पुढील सात दिवसांपर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमअंतर्गत परभणी जिल्ह्यातील 9५-जिंतूर, 9६-परभणी, ९७-गंगाखेड, 9८-पाथरी विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशांनुसार परभणी जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये तपशिलानुसार मतदान केंद्रांच्या नावातील बदल, मतदान केंद्रांच्या स्थानातील बदल, विलिनीकरण व नविन प्रस्तावित मतदान केंद्रांचे प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले आहेत.