आपला जिल्हा
विद्यार्थ्याने अभ्यासाबरोबरच आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे – डॉ. कुलकर्णी
ज्ञानतीर्थ विद्यालयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत लठ्ठपणा व मधुमेह आजारावर मार्गदर्शन

सेलू ( प्रतिनिधी ) :- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ विद्यालय सेलू येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेल्या “ लठ्ठपणा व मधुमेह ” यासारख्या आजाराची माहिती व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान (ता.8) वार सोमवार रोजी शाळेच्या क्रीडांगणावर पार पडला.
या कार्यक्रम प्रसंगी मुख्य मार्गदर्शक सेलू येथील लठ्ठपणा, मधुमेह तथा हृदयरोग तज्ञ डॉ.सुनील कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके, इंद्रजीत मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
लठ्ठपणा हा एक प्रकारचा आजार असून काही लोकांचे आहार आणि व्यायाम करूनही वजन वाढू शकते. लठ्ठपणा हा मानवी शरीरात अनेक अनुवांशिक, एपिजेनेटिक आणि न्यूरो-हार्मोनल मार्गांनी प्रवेश करतो. जर एखादी व्यक्ती आधीच लठ्ठपणाने ग्रासलेली असेल तर त्याच्या तीव्रतेनुसार उपचार करणे आवश्यक आहे. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जेव्हा सेवन करण्यात येते तेव्हा त्याचे रूपांतर चरबीत होते. सुरुवातीला चरबीच्या पेशी आकाराने वाढतात. शरीराला काम करण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती कॅलरीजपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठवून राहतात व लठ्ठपणास सुरुवात होते. बैठे काम करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा जास्त आढळून येतो. लठ्ठपणाकडे दुर्लक्ष केल्यास काय दुष्परिणाम होतात, लठ्ठपणातील आहार कसा असावा याबाबत माहिती दिली.
मधुमेह आता सगळ्यांना माहित असलेला आजार झालाय. दर दहा माणसांमागे ४ माणसांना तरी मधुमेहाची समस्या असतेच. खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे. त्यातल्या त्यात डायबिटीज टाइप-1 आणि डायबिटीज टाइप-2 या श्रेणीतील रुग्ण तर झपाट्याने वाढत आहेत. जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारत ओळखला जातो हि एक खेदाची गोष्ट आहे. पूर्वी मधुमेह म्हटला कि लोकं घाबरून जायचे, आताही घाबरतातच पण त्यामानाने आता बऱ्यापैकी जागरुकता निर्माण झाली आहे. भरपूर तहान लागणे, नेहमीपेक्षा भरपूरवेळा लघवीला जावं लागणं, विशेषतः रात्री, दृष्टी कमकुवत होणं, ब्लड प्रेशर आणि त्वचेशी निगडीत समस्या, खूप भूक लागणे आणि थकवा जाणवने हि मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत.